धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेनेच्या दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोप होत असतांना आता ठाकरे गटाच्या खासदारांनी शिंदेंच्या सेनेवर टीकास्त्र सोडले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळ्यासाठी शिवसेना नेते व पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव येथे आले होते. यावेळी त्यांनी धाराशिवच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक देखील पार पडली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना धाराशिव जिल्ह्यात काही बदल झाला तर वावगे वाटायला नको, भविष्यात तुम्ही बघाल पुढे काय होते ते, असे सूचक विधान केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी देखील ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्यबाण सुरू असून अनेक आमदार खासदार पक्षात येणार, असे विधान केले होते.
आता या सगळ्यावर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेच्या या मंत्र्यांना टोला लगावला आहे. धाराशिवच्या बालाघाटमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून वाघ हिंडत आहे तो आधी पकडा, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी लगावला आहे. तसेच त्या वाघासोबत दोन बिबटे पण आलेले आहेत, असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला आहे. माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी आमदार खासदार फुटीची चर्चा देखील फेटाळून लावली आहे.
दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पहिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला तानाजी सावंत अनुपस्थित होते. तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने ते नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी पुन्हा एकदा बैठकीला अनुपस्थित राहत दाखवून दिली आहे. यावर प्रताप सरनाईक यांनी टोला देखील लगावला आहे. ते म्हणाले, राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही ती बदलत असते, आदलाबदल होत असते, असा टोला सरनाईक यांनी तानाजी सावंत यांना लगावला आहे.