व्होडाफोन-आयडिया कंपनीत केंद्र सरकारची सर्वात मोठी भागिदारी, थकबाकीला भागिदारीत रुपांतरीत करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळानं दाखवला हिरवा कंदील
दिल्ली : भारतातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडियाला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हजारो कोटींची थकबाकी असलेल्या व्होडाफोन-आयडिया कंपनीत आता केंद्र सरकारची सर्वात मोठी भागिदारी असणार आहे.
कर आणि इतर स्वरुपाच्या थकबाकीला भागिदारीत रुपांतरीत करण्याच्या प्रस्तावाला व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळानं हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळं व्होडाफोन-आयडिया कंपनीत सरकारची ३६ टक्के भागिदारी असणार आहे. व्होडाफोन ग्रूपचा हिस्सा २८.५ टक्के तर आदित्य बिर्ला ग्रूपच्या आयडियाचा हिस्सा १७.८ टक्के असणार आहे.
व्होडाफोन कंपनीला सरकारला ५८ हजार कोटी देणे बाकी आहे. त्यामुळे कंपनीची स्थिती सध्या दयनीय असल्याचे सांगितले जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने थेट सरकारला हिस्सा देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार सरकारचा देणं असलेल्या रकमेच्या तुलनेत ३६ टक्के हिस्सा कंपनीत राहणार आहे. टेलिकॉम क्षेत्रातील ही मोठी घडामोड मानली जात आहे.