मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणात दोषी ठरलेले बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांना कोल्हापूरात मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. शिवाजी पेठ, कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या डॉ. पाटील यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवण पोलिसांचे पथक चार दिवसांपासून कोल्हापूरात तळ ठोकून होते, परंतु पाटील यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर मध्यरात्री तीन वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले. या अटकेमुळे त्यांच्या शैक्षणिक संस्थेत खळबळ माजली आहे. डॉ. चेतन पाटील यांनी 2010 पासून एका शैक्षणिक संस्थेत कार्यरत असताना दोन वर्षांपूर्वी पीएचडी पदवी संपादन केली होती. मात्र, पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर ते अदृश्य झाले होते. त्यांच्या मोबाइल लोकेशनद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न झाला, पण मोबाइल स्विच ऑफ असल्याने शोध घेण्यात अडचणी आल्या.संयुक्त पोलिस पथकाने त्यांच्या कुटुंबीयांशी व मित्रांशी संपर्क साधून चौकशी केली होती, परंतु कोणतीही ठोस माहिती मिळाली नव्हती. अखेर, रात्रीच्या शोधमोहीमेनंतर डॉ. पाटील यांना अटक करण्यात यश आले आहे.