मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज दि. १० भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. फडणवीस यांनी राज यांच्या घरी ब्रेकफास्टही केला. मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे महापालिका निवडणुकांमध्ये मनसे महायुतीसोबत जाणार? असे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेऊ शकते. यामध्ये भाजप काही जागा मनसेला सोडू शकते. तसेच अमित ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, त्यामुळे त्यांना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून घेतले जाऊ शकते, अशा चर्चा सुरू आहेत.
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज यांच्यासोबत राजकीय भेट नव्हती. बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा अभिनंदनासाठी फोन आला होता. त्यावेळी त्यांना घरी येईल, असे सांगितले होते. म्हणून आज त्यांच्या घरी गेलो होतो. तेथे ब्रेकफास्ट केला आणि गप्पा मारल्या. या बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीसाठी त्यांच्या घरी गेलो, असे फडणवीस यांनी सांगितले.