नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी गेल्या अनेक दिवसापासून विविध प्रकरणाच्या माध्यमातून अडचणीत येत आहेत. दि.२ फेब्रुवारी रोजी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख मंगेश करंजकर याने पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस ठाण्यात श्रीमुखात दिल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याप्रकरणी सत्ताधारी शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख मंगेश सोमनाथ करंजकर याला तपासासाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. मंगेश करंजकर पोलिस ठाण्यात येताच पोलिस कर्मचाऱ्यांना शिव्याशाप करत मला बोलवले कसे, सत्तेत आम्हीच तुमची हिंमत कशी झाली असे म्हणत त्रास दिला तर दंगली घडवून आणेल, असे म्हणत असतानाच फिर्यादी पोलिस कर्मचारी पोलिस हवालदार राजेंद्र त्रंबक मोजाड यांनी त्याला शांत राहण्याची सूचना दिली. मात्र, करंजकर याने त्या कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात देत करायचे ते करा असे म्हणत शिवीगाळ केली.