मुंबई: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज बुधवारी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. वीर सावरकर यांच्या नावाने भाजप राजकारण करत आहे, मात्र वीर सावरकर यांना भारतरत्न देत नाही. सावरकरांना भारतरत्न न देणाऱ्या भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. दरम्यान यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वीर सावरकर यांना देशद्रोही, समलैंगिक म्हणणाऱ्या कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली आहे. सावरकरांचा सन्मान न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.