ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेचे वित्त विभागाला आले टेन्शन

मुंबई : वृत्तसंस्था

राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केल्याने राज्यभरातून या योजनेला महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र ही बहुचर्चित योजना अडचणीत आली असून राज्य वित्त विभागाने यासाठी होणाऱ्या खर्चावरुन चिंता व्यक्त केली आहे.

मंत्रिमंडळात चर्चा होण्यापूर्वी राज्याच्या वित्त विभागाने महिला व बालकल्याण विभागाच्या वर्षभराच्या कार्यक्रमांसाठी आधीच ४,६७७ कोटी रुपये वाटप करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले होते, मात्र तरीही लाडकी बहीण योजनेला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. राज्याची आर्थिक स्थिती पाहता, आवश्यक निधीची व्यवस्था कशी केली जाईल याबाबत वित्त विभागाला चिंता आहे. तसेच आत्तापर्यंत 40 लाखांहून अधिक महिलांनी यासाठी नोंदणी केली असल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, अर्थविभागाच्या या अहवालानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी महत्वाचे विधान केले आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायच्या नाहीत अस काही नसतं. अर्थ खात्याने त्यांचं काम केलं असेल पण योजना राबवली जाणार हे निश्चित आहे,’ असं नरेश म्हस्के म्हणालेत.

चिंतेची गरज नाही- सुधीर मुनगंटीवार

‘अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. 17 -18 लाख कर्मचाऱ्यांना वेतनाचा भार येत नाही. दोन- अडीच कोटी महिलांना लाभ देताना अडचण कशी येते? गरीब महिला जेव्हा खरेदी करेल तेव्हा बाजाराला फायदा होणार आहे. सोळा-सतरा लाख लोकांसाठी 44 हजार कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला, मात्र आता अर्थशास्त्र आणि तिजोरी आठवते?’ असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!