नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज प्रजासत्ताकदिनानिमित्त देशभर मोठी धामधूम सुरु आहे. तर दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील कलावंतांनी या चित्ररथातील शिल्प साकारले आहे. पाटणबोरी येथे यशवंत एनगुर्तीवार यांच्या स्टुडिओमध्ये या शिवरायांच्या चित्ररथातील शिल्प साकारले आहे.
यवतमाळच्या कलावंताचं शिल्प दिल्लीमध्ये पोहोचलं आहे. या चित्ररथाचे उर्वरीत काम दिल्लीत पार पडले आहे. छत्रपती शिवरायांची लोकशाही प्रतिबिंबित भारताचा विकास, लोकशाही या विषयांना अनुसरून असलेल्या चित्ररथाचा समावेश आहे.
भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावरील राज्याच्या चित्ररथामध्ये महाराजांचे लोकशाहीला अनुसरून असलेला राज्यकारभार अधोरेखित करण्यात आला आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात बाल शिवाजींसह मॉ जिजाऊंची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे. तर मागे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, न्यायाचा प्रतीक तराजू, संभाजी महाराज कामकाजात सहभागी महिला, गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांची दखल घेणारे महाराज आदी दृश्य दिसले. सोबतच, हिरकणी, दिपाऊ बांदल, सावित्री देसाई, सोयराबाई, कल्याणच्या सुभेदारांची सून अशा शिवकालीन शूर स्त्रियांच्या प्रतिकृती देखील चित्ररथात दिसून येत आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून सहभाग जिल्ह्यासाठी अधिक अभिमानाची बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून चित्ररथ साकारणाऱ्या या समुहामध्ये जिल्ह्यातील या कलावंतांचा समावेश कायम आहे. मागील कलावंतांच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठ संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्याची जबाबदारी होती.