---Advertisement---

काँग्रेसला निवडणुकीआधीच धक्का ; माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपात प्रवेश

By team
On: December 18, 2025 2:40 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आज मुंबई येथे भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, भाजपची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे. या वेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिलीप माने यांच्यासोबत माजी नगरसेवक जयकुमार माने, नागेश ताकमोगे आणि पृथ्वीराज माने यांनीही भाजपात प्रवेश केला. त्यामुळे सोलापूर शहरासह ग्रामीण भागात भाजपचा जनाधार मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांचा भाजप प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर आज त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

दिलीप माने यांच्या प्रवेशामुळे सोलापूरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा थेट परिणाम दिसून येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!