मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. मुंबई ३५, पुणे ७, पुणे ग्रामीण – १ अशा एकूण नवीन ४३ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये एकट्या मुंबईत सर्वाधिक ३५ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या २४८ पर्यंत पोहोचली आहे. हे सर्व निदान झालेले रुग्ण असून सौम्य स्वरूपाचे आहेत.
मात्र, खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला असून त्यांनी विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था केली. रविवारी मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. राज्यातील इतर जिल्ह्यांत रविवारी एकही रुग्ण आढळलेला नाही.
जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ७ हजार ३८९ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ३०० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात केवळ मुंबई विभागात एकूण २४८ रुग्ण सापडले आहेत, तर आतापर्यंत ८७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
ठाण्यात 21 वर्षीय युवकाचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. हा कोरोनामुळे मृत्यू झालेला पहिला रुग्ण आहे. ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलाय गेल्या काही दिवसांपासून त्या युवकावर उपचार सुरु होते. उपचारादारम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तो युवक मुंब्रा येथील होता. शनिवारी सकाळी त्याचा 6 वाजता मृत्यू झाला. संबंधित युवकाला 22 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.