नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात ठाकरे गटाचे नेते महायुतीवर वारंवार टीका करीत असतांना आता महायुती सरकारचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, उद्धव ठाकरे असेच बोलत राहतात. महाविकास आघाडीच्या काळात 1000 बाबी आमच्याकडे आहेत. आता आरोप-प्रत्यारोपाचे दिवस नाही. आमच्या सरकारला मोठे बहुमत जनतेने दिले आहे. आम्हाला 52 टक्क्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. आज आमचा फोकस जनतेचे कामं करण्यावर आहे. देवेंद्र फडणवीसांचे सरकार वचनपूर्तीसाठी काम करत आहे. आता कुणी आरोप-प्रत्यारोप केला यात पडायचे नाही. आम्हाला विकसित महाराष्ट्राचा संकल्पावर काम करायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार मराठवाडा, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्र याचा विकास कसा करेल यावर आमचा फोकस आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मराठवाड्याला न्याय द्यायचा असेल तर एक विभागीय आयुक्त कार्यालय नांदेड भागात असले पाहिजे. त्याला जर कुणी विरोध करत असेल तर आम्ही त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीशी चर्चा करु. छत्रपती संभाजीनगरला 8 जिल्ह्याचे विभागीय आयुक्त कार्यालय असणे त्यापेक्षा नांदेड-लातूर हा भाग महत्त्वाचा आहे.आणि आम्ही लोकप्रतिनिधी बसून नांदेडमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मार्ग काढू. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक होईल. या चार जिल्ह्याला न्याय मिळावा यासाठी मी लक्ष घालणार आहे. विभागीय आयुक्तालय संभाजीनगरला आहे, त्यांचे विभाजन केले पाहिजे. नांदेड किंवा लातूर असा वादच नाही. लवकरच याचा निर्णय होईल.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी ज्या बाबी करायची गरज होती त्या सर्व बाबींवर सरकारने काम केले आहे. त्यांच्या कुटुंबियांची काही मागणी असेल तर आपण ती देखील पूर्ण करू. ज्या ज्या चौकश्या अपेक्षात आहे त्या चौकश्या आम्ही पूर्ण करणार आहोत. मला विश्वास आहे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुटणार नाही. फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आमचे सरकार मागे लागणार आहे. कुठलाही पुरावा नष्ट होणार नाही, यासाठी फडणवीस योग्य ती खबरदारी घेत आहेत.