मुंबई : वृत्तसंस्था
देशातील सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जंगी तयारी केली असून आता राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी फुट पडली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसाआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजप व शिंदेसोबत हातमिळवणी करीत राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यापासून शरद पवार व अजित पवार गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता अजित पवार गटाच्या आमदाराने थेट सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
“बारामती आणि शिरूर लोकसभेतील विद्यमान खासदार आदरणीय सुप्रियाताई व आदरणीय कोल्हे साहेब गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरले आहेत. राज्यभर फिरणाऱ्या या दोन्ही मोठ्या नेत्यांना मतदारसंघात अडकून राहावे लागणे यातच अजितदादांचे महत्व अधोरेखित होते”, असा टोला अमोल मिटकरी यांनी एक्स पोस्टवरून लगावला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार असं शाब्दिक युद्ध रंगलं आहे. शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हेंनी जिंकावं म्हणून मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं होतं, असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ते कसे जिंकतात तेच पाहतो असं म्हणत या मतदारसंघातून अजित पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात येईल, असंही अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या आव्हानाला अमोल कोल्हेंनी स्वीकारलं असून आगामी निवडणुकीत माझाच विजय होईल, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.