मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात नव्या वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले आहे तर अनेकांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक तीर्थस्थळावर दर्शन घेवून नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मातोश्री यांनी देखील पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेतले आहे.
लोकसभा-विधानसभेतील चुरस उभ्या भारताने अनुभवली. राजकारणाचे परिणाम कुटुंब-कबिल्यावर दिसून आले. पण 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजितदादांनी जातीने हजर राहत शुभेच्छा दिल्या. तेव्हा दोन पक्ष एकत्र आणण्याची हलगी वाजली. तर आता अजितदादांच्या आई आशाताई पवार यांनी थेट पांडुरंगालाच पवार कुटुंबातील मतभेद मिटवण्याचे, पुन्हा कुटुंब एकत्र येण्याचे साकडे घातले.
2019 वर्षानंतर राज्यातील राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेना भाजपा खेम्यातून महाविकास आघाडीच्या बंधनात बांधली गेली. तर पुढे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली. दोन गट दोन दिशेने गेले. एकाने पुरोगामीचा तर दुसर्याने उजव्या विचारसरणीचा झेंडा हाती घेतला. या पक्ष फुटीचा थेट परिणाम बारामतीच्या सत्ता वर्तुळात सुद्धा दिसून आला. अजित पवार-शरद पवार ही काका-पुतण्याची जोडी फुटली. राज्याच्या राजकारणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली. दादा विरुद्ध थोरले पवार असा सामना दिसला. दिवाळी पाडव्याला दोन्ही पवार एकत्र न आल्याने गहजब झाला.