वीज पडण्याच्या पूर्वीच सूचना देणार दामिनी ॲप; शेतकऱ्यांसाठी वरदानच ! तहसीलदार बाळासाहेब सिरसट म्हणाले …
.
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२५ : पृथ्वी मंत्रालय भारत सरकारच्यावतीने वीज पडण्याच्या पूर्वी
सूचना देणारे ‘दामिनी’ ॲप आले आहे.याचा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे,अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली.सर्वच ठिकाणी मान्सून कालावधीत विशेष:ता जून व जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी होत असते. वीज पडून जीवित हानी होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे ॲप तयार करण्यात आले आहे.सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपल्या शासनाने तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी ,कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील ,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांना सदरचे ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे व गावकऱ्यांना त्याचा वापर करण्याबाबत प्रवृत्त करण्यात यावे,अशा सूचना देण्यात आले आहेत.सदरचे ॲप जीपीएस लोकेशनचे काम करत असून वीज पडण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी सदरच्या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.आपल्या ॲप मध्ये आपल्या सभोवताली वीज पडत असल्यास सदरच्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे, सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये यावरचे त्यांना निर्देश देण्यात यावे व
इतर सामान्य नागरिकांना हे ॲप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे अशा सूचना देण्यात आले आहेत.आपापल्या स्तरावर व्हिडिओ कॉन्फरन्स व संबंधितांच्या बैठका आयोजित करून दामिनी अप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून वापर करण्याबाबत सूचना देण्यात यावे व तसा अहवाल वरीष्ठ कार्यालयाला सादर करावा,अशी सूचना वरिष्ठ पातळीवरून तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी अक्कलकोट तालुक्यात सुरू झाली आहे. जीवित हानी टाळण्याच्यादृष्टीने दामिनी ॲप हे सर्वांसाठी वरदान ठरणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
जीवितहानी
टळू शकेल
उन्हाळा संपत आला आहे लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे.वादळी वारे सुरू आहेत.अशा परिस्थितीमध्ये दामिनी ॲप हे खूप उपयोगी आहे याचा वापर तालुक्यात सर्वांनी करावा. वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी ॲप्सचा वापर होणे आवश्यक आहे.यातून जीवितहानी टळू शकेल.
बाळासाहेब सिरसट,तहसीलदार