मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी महिलांच्या अंगणवाडी केंद्राजवळ मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहेत. मात्र ऑनलाइन अर्ज करताना काही तांत्रिक अडचणींमुळे ठिकठिकाणी महिलांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यामुळे महिलांना आता अर्ज करणे सोपे अधिक होणार आहे. यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी नारी शक्तीदूत ॲप सुरू केले होते. मात्र या ॲपवर अनेकदा सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे आता https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाइट सुरु करण्यात आली आहे. या नवीन वेबसाइटमुळे अर्ज अगदी सोप्या पद्धतीने भरता येणार आहे.
नव्या वेबसाईटद्वारे अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पासबुक, अर्जदार महिलेचा फोटो, जन्म प्रमाणपत्र आणि लग्न झाले असल्यास मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे. तसेच 21 ते 65 वयोगटातील महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करु शकणार आहेत. दरम्यान, याआधी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करणाऱ्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.