पुणे : वृत्तसंस्था
ससून रुग्णालयात उंदीर चावल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ससूनच्या प्रशासनाला धारेवर धरत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत असल्याची माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी सांगितले.
सागर दिलीप रेणुसे (३०) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. त्याचा १५ मार्चला रात्री १० वाजता गंभीर अपघात घडला होता. मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवत असताना त्याचा अपघात घडला होता. त्यानंतर त्याला १६ मार्चला रात्री उशिरा ससून रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल केले. दरम्यान, सागर रेणुसे याचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यात मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याचबरोबर त्याच्या शरीरावर उंदराने चावा घेतल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत, असे ससूनच्या प्रशासनाने म्हटले आहे.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे म्हणाले की हा रुग्ण ससूनमध्ये १६ मार्चला दाखल झाला होता. दारू पिऊन पडल्यामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी अवस्थेत होते. २९ तारखेपासून तो व्हेंटिलेटरवर होता. १ तारखेला आमच्याकडे सकाळीच तक्रार आली की, या रुग्णाला उंदराने चावा घेतला आहे. मात्र, उंदीर चावणे आणि त्याच्या मृत्यू हे दोन्ही गोष्टी जोडणं योग्य नाही. ससूनमध्ये खरंच असा काही प्रकार घडला आहे का, याची चौकशी करण्यासाठी समिती तयार करण्यात येणार आहे. त्यात चौकशीअंती सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे त्यांनी सांगितले.