मुंबई : वृत्तसंस्था
लोकशाहीच्या प्रक्रियेत जनतेला न्याय देण्यासाठी पीठासीन अधिकारी यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. परिषदेत घेतलेले निर्णय पंचायतराज ते संसदेपर्यंत लोकशाही संस्थांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. या परिषदेमुळे देशातील लोकशाही संस्थांना नवी दिशा मिळणार असल्याचे मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.
बिर्ला म्हणाले, गेल्या दोन दिवस या परिषदेच्या माध्यमातून झालेल्या चर्चेत लोकशाही मजबूत आणि पारदर्शक होण्यास नक्कीच मदत होणार आहे. तसेच लोकशाही प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा घटक हे जनता आहे. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढवण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. लोकशाही बळकट करण्यात पंचायतराज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
मुंबईत झालेल्या या परिषदेच्या माध्यमातून विधिमंडळ आणि केंद्रीय मंडळ यात अधिक संवाद वाढण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तसेच विधिमंडळ कामकाजात शिस्त म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी जबाबदारीपूर्वक वतणूक ठेवणे गरजेचे आहे. लोकशाहीत जलदगतीने कामकाज होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कामकाजात वाढवण्यासाठी या परिषदेत या वेळी चर्चा करण्यात आली. २०२४ पर्यंत ‘एक देश एक विधिमंडळ’ ही संकल्पना या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे बिर्ला यांनी या वेळी सांगितले.