ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली नाराजी, फडणवीस आणि बोम्मई यांच्यामध्ये झाली फोनवरून चर्चा

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाने पुन्हा डोके वर काढली आहे. बेळगावातील हिरे बागेवाडी टोलनाक्यावर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंग असलेल्या पाच वाहनांवर हल्ला केला होता. याशिवाय महाराष्ट्राची पासिंग असलेल्या प्रत्येक वाहनावर चढून महाराष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. या धक्कादायक घटनेविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून अनेक नेत्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांनी पाणीप्रश्नावरून आक्रमक होत कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सोलापूरातील अक्कलकोट, पंढरपूर तालुक्यातही अशीच मागणी झाली. पुढे नाशिकमधल्या सुरगाणा तालुक्यातल्या नागरिकांनी गुजरातमध्ये तर नांदेड जिल्ह्यातल्या गावांनी तेलंगणामध्ये जाण्यासाठी मागणी केली. त्यामुळे पुन्हा एकदा सीमावादाच्या ठिणग्या पेटल्या आहेत. त्यात आज मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करणातकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी या तोंडफोडीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आणि तात्काळ जे लोक आशा प्रकारच्या कृती केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार मध्यमाशी बोलताना सांगितले.

बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करणाऱ्या कन्नड वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फडणवीसांना सांगितलं आहे. याशिवाय महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!