नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी रात्री दिल्ली गाठून भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुपचूप भेट घेतली. विशेष म्हणजे राज्यातील भाजपचे नेतेही या भेटीबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले जाते. विधानसभा जागावाटप, केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा समावेश, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांत समावेश या मुद्द्यांवर दाेघांत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, अजितदादा दिल्लीहून परतल्यानंतर बुधवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर जाऊन त्यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २९ जुलै रोजी विधिमंडळातील कार्यक्रमास हजर राहणार आहेत. त्यापूर्वी महायुतीत बऱ्याच हालचाली सुरू आहेत. अमित शाह पुण्यात सभेसाठी आले होते तेव्हाही अजितदादा व त्यांच्यात बंदद्वार चर्चा झाली होती. दिल्लीतील भेटीवेळी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे हेही उपस्थित होते. दरम्यान, अजितदादा मुंबईत परतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. या वेळी अजितदादांनी अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील फडणवीस यांना सांगितला.