बीड : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत आले असून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले. त्यात वाल्मिक कराड हाच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान करुणा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने राजकीय खळबळ उडाली आहे. 3 मार्च रोजी धनंजय मुंडे राजीनामा देतील असा दावा त्यांनी या पोस्टमध्ये केल्याने राज्याच्या राजकीय गोटात स्फोट झाला आहे. तर हे प्रकरणात न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा मोठा हातभार लावला. त्यांनी याप्रकरणात मोठे विधान केले आहे.
आपण करूणा मुंडे यांची फेसबुक पोस्ट वाचली नाही. त्यांचा दावा माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला कळला आहे. करुणा ताईंना कुठून माहिती मिळाली माहिती नाही. पण खरंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असेल तर ‘देर है पर अंधेर नही’, असंच म्हणावं लागेल, असे ते म्हणाले. असं जर झालं असेल तर त्यांचे स्वागतंच असल्याचे ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी सुद्धा या प्रकरणात सखोल तपास होऊ द्या. जे दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी भूमिका घेतली होती. आता सीआयडीने न्यायालयात जे 1800 पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्याचे समोर येत आहे. त्यावर बोलताना बजरंगबप्पा यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय जोपर्यंत सार्वजनिक होत नाही, तोपर्यंत त्यावर बोलण्यास नकार दिला. मात्र वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे, हे आम्ही सर्वच जण पहिल्या दिवसापासून सांगत होतो, हे त्यांनी स्पष्ट केले. मुंडे यांनी वाल्मिक हा आपला निकटवर्तीय आहे, हे अगोदरच सांगितल्याची आठवण ही खासदार सोनवणे यांनी करून दिली.
करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे उद्या, 3-3-2025 रोजी राजीनामा देतील असा दावा करणारी फेसबुकवर पोस्ट केली आहे. तर याच पोस्टमध्ये अजित पवार यांनी मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच घेतल्याचा दावा केला आहे. याविषयी अद्याप राष्ट्रवादीच्या गोटातून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र करुणा मुंडे यांच्या या पोस्टमुळे मोठे वादळ राज्याच्या राजकारणात आले आहे हे नाकारून चालणार नाही.