कऱ्हाड वृत्तसंस्था
पाल (ता. कऱ्हाड) येथे बुधवारी (ता. ६) कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचाराच्या प्रारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुती विकासाच्या बाबतीत निधी देण्यात कुठेही मागे पडणार नाही. आमच्या सरकारने जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना सिंचनासाठी दहा हजार कोटी दिले आहेत. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले आहे.
तर येणाऱ्या पाच वर्षांची बिले माफ केली जाणार आहेत. पुढील दोन वर्षांनंतर २४ तास ३६५ दिवस कृषिपंपाना वीज मिळणार आहे. शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी पाजण्याचा त्रास यापुढे होणार नाही. शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उत्पन्नावर आकारण्यात येणारा इन्कम टॅक्स यापुढे लागणार नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, अशोकराव गायकवाड, शंकरराव शेजवळ, विक्रम कदम, चित्रलेखा माने कदम, संपतराव माने, सचिन नलवडे, भरत पाटील, संपतराव जाधव, महेश जाधव तसेच उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीला पाठिंबा दिलेले उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.