नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यापैकी अनेकजण त्यांच्या श्रद्धेनुसार मंदिरात दान देतात. यामध्ये उद्योगपतीपासून ते सामान्य भक्तंपर्यंत सर्वांचा समावेश असतो. अशातच एका भाविकाने अलीकडेच तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल 121 किलो सोने दान केले आहे.
या सोन्याची किमत जवळपास 140 कोटी रुपये असल्याचे सांगितले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, एका भक्ताने व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिरात प्रार्थना केली होती. श्री वेंकटेश्वर स्वामीच्या कृपेने त्याला व्यवसायात यश मिळाले आणि त्याने कंपनीचे 60 टक्के शेअर्स विकून 6,000 ते 7,000 कोटी रुपये नफा मिळवला. त्यानंतर त्याने 121 किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला.
मंदिरातील मूर्तीला दररोज 120 किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. ही बाब त्याला समजल्यानंतर त्याने 121 किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे माणने त्याने हे गुप्त दान असल्याचे सांगत स्वतःची ओळख उघड न करण्याची विनंती केली आहे. तिरुपती बालाजी मंदिरात अशाप्रकारे दान देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा या मंदिराला मोठे दान मिळाले आहे.