कोल्हापूर वृत्तसंस्था
कोल्हापूर येथील भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर येथील महायुतीच्या सभेत महाडिक यांनी एक वक्तव्य केले होते, त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या सभेला जाणाऱ्यांचे फोटो काढून घ्या आणि आम्हाला आणून दाखवा असे धनंजय महाडिक यांनी स्टेटमेंट दिले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला होता.
फोटो काढून आम्हाला दाखवा
जर इथं काँग्रेसची रॅली निघाली. त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या. ज्या आपल्या योजनेचे 1500 रूपये घेतात. त्यांचे फोटो काढून घ्या. फोटो काढा त्यांची नावं लिहून घ्या. बरोबर आहे की नाही…. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि जायचं त्यांच्या रॅलीत असं नाही चालणार. काही लोक छाती बडवत होते. आम्हाला नको पैसै… आम्हाला नको पैसै आम्हाला सुरक्षा पाहिजे, असं म्हणत होते. पैसे नकोत? राजकारण करता या पैशाचं? काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडं द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कुणी मोठ्यानं भाषण करायला लागली. दारात आली तर लगेच फॉर्म द्यायचा. म्हणायचं बाई तुला नको आहेत ना पैसै ? मग यावर सही कर म्हणायचं. लगेच उद्यापासून पैसे बंद करतो म्हणायचं. आमच्याकडं काय पैसे लय झालेले नाहीत, असं महाडिक यांनी म्हटले आहे.