घिसाडी तेर्मा समाजाच्या आरक्षणात लोहार समाजाला वाटेकरी करू नका, अन्यथा राज्यभर घिसाडी समाज आंदोलन करणार; प्रदेशाध्यक्ष राजकुमार सुरवसे यांचा इशारा
सोलापूर,(प्रतिनिधी):- घिसाडी तेर्मा आणि लोहार हे दोन वेगळे आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने घिसाडी तेर्मा समाजाच्या आरक्षणात लोहार समाजाला वाटा देण्याचे ठरवले आहे त्यानिर्णयाचा फेरविचार केला पाहिजे. घिसाडी तेर्मा समाजाला लोहार समाजाच्या रांगेत बसवून या समाजातील आरक्षण दोन समाजात वाटप करण्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय अन्यायकारक व आयोगाच्या बौध्दिक दिवाळखोरीचे लक्षण दिसून येत असल्याचे घिसाडी तेर्मा बहुउद्देशीय संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजकुमार सुरवसे यांनी सांगितले.
दोन समाजामध्ये विनाकारण तेढ निर्माण झाले असून घिसाडी तेर्मा ही जमात आणि लोहार समाज एक नसून ते भिन्न आहेत. हे अनेकवेळा राज्य मागासवर्ग आयोगाच्या लक्षात आणून दिले असतानाही शासन निर्णयात भट्नया जमाती ब च्या सुचीमधील क्रमांक 8 वरून काढून त्या ठिकाणी जाणून बुजून लोहार जातीला बसवले आहे. हे अन्यायकारक असल्याचे मत घिसाडी तेर्मा बहुउद्देशीय संघाचे महाराष्ट्रअध्यक्ष राजकुमार सुरवसे यांनी सांगितले. महासंघाने देशाचे राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल, राज्य मागासवर्ग आयोग व राष्ट्रीय महागासवर्ग आयोग यांना याबाबत निवेदने देवून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. मा. राष्ट्रपतींनीही महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाला पत्र देवून घिसाडी जमातीची सूचीतील क्रमांक 8 वरून काढणे हे अन्यायकारक असून त्याचे पुनरावलोकन करावे असे सुचित केले आहे. परंतु महाराष्ट्र सरकार सदर बाबीकडे डोळेझाक करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. घिसाडी तेर्मा ही भटकी जात असून लोहार ही जात गाव गाड्यामधील बलुतेदार आहे. असे असतानाही दोन्ही जातींना राज्य मागासवर्ग आयोगाने एकत्र आणून घिसाडी समाजाला मिळणाऱ्या आरक्षणात विनाकारण वाद निर्माण केला आहे. हा अन्याय दूर न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभे करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान प्रारंभी घिसाडी तेर्मा बहुउद्देशीय महासंघ या राज्यस्तरीय संघटनेची बैठक संघटनेचे प्रभारी अध्यक्ष हिरामण चव्हाण यांच्या हस्ते झाली त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून सोलापूरमधील सुर्या ग्रुपचे संस्थापक आणि उद्योजक राजकुमार दत्तात्रय सुरवसे यांची अविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून औरंगाबादचे हिरामण चव्हाण, लातूरचे अंकुश कुमार चव्हाण, दर्यापूरचे संजय सोळंके यांची सचिव म्हणून, कार्यकारी अध्यक्ष म्हणून शिरूरचे ईश्वर पवार, हंबीरराव पडोळकर, हिरामण पांचाळ,विरार पालघर यांची मुख्य सल्लागार म्हणून निवड करण्यात आली तसेच शिक्रापूरचे नंदकिशोर चव्हाण सहसचिव, सोलापूरचे नंदकिशोर चव्हाण कोषाध्यक्ष, महेंद्र सुरवसे संघटन सचिव, तासगांवचे अजय चव्हाण संघटन सचिव, जालनाचे नारायण पवार संघटन सचिव, पुण्याच्या डॉली सोळंके आणि सोलापूरच्या उमा सुरवसे, पिंपळगांव बसवंतचे मोतीराम पवार,औरंगाबादचे शिवदास पवार आणि यवतमाळचे रामकृष्ण पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. ही बैठक माहेश्वरी भवन अकोट रोड बनोसा येथे पार पाडली.