गडचिरोली : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरण ताजे असताना आता गडचिरोलीमधून देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. देसाईगंज तालुक्यातील विसोरा गावात डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा धुर्वेला असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांना प्रसुतीसाठी गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. मात्र बराच वेळ झाल्यानंतर प्रसुती न झाल्याने कुटुंबियांनी तिला देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. विसोरा येथील उपकेंद्रातील डॉक्टर गणेश मुंडले आणि परिचारिका उके यांनी कुटुंबियांना आणखी काही वेळ थांबण्याचा सल्ला देत रुग्णवाहिका परत पाठवली. परंतु 12 तासानंतरही प्रसुती न झाल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथेही प्रसुती न झाल्याने 14 एप्रिला गर्भवती मातेला ब्रह्मपुरीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. एवढेच नाहीतर तिच्या बाळाचाही पोटातच मृत्यू झाला.
देसाईगंज येथे मनिषाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु झाली. यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि गावकऱ्यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन करत दोषी डॉक्टर आणि परिचारिकांना निलंबीत करेपर्यंत मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका घेतली. यानंतर काही काळ रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.