पंढरपूर : वृत्तसंस्था
राज्यातील पंढरपूरच्या मंदिरातील गाभाऱ्यात श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीवर बसवण्यात येणाऱ्या मेघडंबरीसाठी आवश्यक २२५ किलो चांदी एका अज्ञात भाविकाने दान केली आहे. त्याचे बाजारमूल्य सुमारे २ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या दानशूर भक्ताने आपले नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे. येत्या ४ जुलैपर्यंत चांदीने मढवून ही मेघडंबरी गाभाऱ्यात बसवण्यात येईल.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. यानिमित्ताने गाभाऱ्यातील पूर्वीची मेघडंबरी काढण्यात आली. त्या ठिकाणी नवीन मेघडंबरी बसवण्यात येत आहे. सागवानी लाकडापासून पंढरपूरमध्येच तयार केलेल्या दोन मेघडंबरी ४ जून रोजी मंदिरात आणण्यात आल्या. त्याला चांदीने मढवण्याचे नियोजन मंदिर समितीने केले होते. एका अज्ञात भाविकाने त्यासाठी मंदिर समितीकडे संपर्क साधून मेघडंबरीसाठी लागणारी २२५ किलो चांदी दान केली, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. पुणे येथील दांगट सराफचे कर्मचारी मेघडंबरीस चांदी मढवण्याचे काम करीत आहेत. चार दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे मंदिर समितीकडून सांगण्यात अाले.
श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्यात मूर्तीवर बसवण्यात येणाऱ्या दोन्ही मेघडंबरी ३०० किलो सागवानी लाकडापासून बनवल्या आहेत. विठ्ठलाच्या मेघडंबरीचे वजन १६० किलो, तर रुक्मिणी मातेच्या मेघडंबरीसाठी १४० किलो लाकूड वापरण्यात आले आहे. पुढील अनेक शतके या दोन्ही मेघडंबरी विठ्ठल मूर्ती शोभायमान करणार आहेत.पंढरपूर : सागवानी लाकडावर चांदी मढवण्याचे काम सुरू झाले आहे.
देश-विदेशातील अनेक भाविक विठ्ठल मंदिरास दरवर्षी लाखो रुपयांच्या देणगी देत असतात. मात्र यापूर्वी जालना येथील एका भाविकाने सुमारे ३ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे मुकुट, सोन्याचा पितांबर दिलेली देणगी आतापर्यंतची सर्वोच्च देणगी होती, पण हा एेवज त्यांनी दोन टप्प्यात दिला होता. या भाविकानेही नाव गुप्त ठेवले होते. मात्र आता आणखी एका अज्ञात भक्ताने एकाच वेळी दिलेली २ कोटींच्या चांदीची देणगी आतापर्यंतची सर्वोच्च ठरली आहे, असे मंदिर समितीतून सांगण्यात आले.