मुंबई : वृत्तसंस्था
बदलापूर येथील शाळकरी लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एनकाऊंटर केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या एनकाऊंटरवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याला मारून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. तर आता या वादात शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा उडी घेतली आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाही तर महिला म्हणून बोलते आहे, असे स्पष्ट करत त्यांनी बाजू मांडली.
पोलिसांनी एन्काऊंटर केलं असेल तर पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुजून एन्काऊंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन, असा आलेला एक मेसेज त्यांनी वाचून दाखवला. कसंही एन्काऊंटर असलं तरीही महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत हे देखील लक्षात घ्यायला हवं. जोपर्यंत कायद्याचा धाक होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे एन्काऊंटर झालीच पाहिजेत. पुरुषी बलात्कारी लोकांवर अशाने वचक बसेल. मी कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाही आहे. मी महिला म्हणून बोलते आहे. मला स्वतःला एक मुलगी आहे, मी महिलांच्या बाजूने बोलते आहे, आम्हा महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. राजकारणी, विरोधक, कोर्ट काय बोलत आहे त्याच्याशी मला पडलेले नाही मी हे महिला म्हणून बोलते आहे. त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण करायची असेल तर अशा प्रकारचे एन्काऊंटर हे झालेच पाहिजेत अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.