मुंबई: वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने सत्ता स्थापन करण्यापूर्वी लाडकी बहीण योजना राबविली होती आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात ₹1500 नाही, तर थेट ₹3000 सन्माननिधी जमा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा न झाल्याने, सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे दोन हप्ते एकत्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे ही रक्कम जमा होण्यास विलंब झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी दोन महिन्यांची रक्कम जमा करण्यात आली होती. सूत्रांनुसार, पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा करू शकते. तथापि, सरकारने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.
‘ई-केवायसी’ (E-KYC) सक्तीची
योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असल्यास सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी न केल्यास पुढील निधी थांबवला जाऊ शकतो. ई-केवायसीसाठी: ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.