ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रकटदिनी भाविकांना ड्रायफूट लाडू, कोकोनट चिक्की, चॉकलेट कुकीजचा प्रसाद

स्वामी समर्थ सेवासार संघाचा उपक्रम,दहा हजार भाविकांना प्रसाद वाटप

अक्कलकोट : प्रतिनिधी

अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय जयघोषात बुधवारी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ सेवा सार संघ,पुणे यांच्यावतीने आयोजित प्रसाद अर्पण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.यावेळी स्वामींना ड्रायफूट लाडू, बेसन लाडू, कोकोनट चिक्की ,चॉकलेट कुकीज व हँडमेड चॉकलेट अशा पक्कानांचा भोग लावून प्रसाद म्हणून अर्पण करण्यात आला.वटवृक्ष मंदिरात पहाटे साडेपाच वाजता मंगल आरतीच्यावेळी पार पडलेला हा कार्यक्रम पत्रकार मारुती बावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, स्वामी सेवासार संघाचे प्रमुख स्वामी वृंदावन दास,स्वामी भक्त सुधीर माळशेट्टी,गणेश बारटक्के,सुप्रिया बावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पूजेनंतर वटवृक्ष मंदिरात आलेल्या दहा हजार स्वामी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला,अशी माहिती स्वामी सेवक स्वामी वृंदावन दास यांनी दिली.दुपारच्यावेळी भाविकांना दिलासा देण्यासाठी संस्थेतर्फे शरबत वाटप करण्यात आले.दरवर्षी प्रकट दिन,पुण्यतिथीच्या निमित्ताने संस्थेकडून स्वामी सेवा म्हणून अनेक उपक्रम राबविले जातात.यावर्षी त्यांनी स्वामींना अनोखा प्रसाद अर्पण केला.दत्त जयंती वेळी अशाच पद्धतीने त्यांनी स्वामी समर्थांना १ हजार १११ किलो फळांचा नैवेद्य अर्पण करून प्रसाद म्हणून भाविकांना वाटला होता.

त्यांच्या संस्थेची स्वामी सेवा चांगली आहे,अक्कलकोटला एक चांगली परंपरा सुरू झाली आहे,असे देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितले.स्वामींचे कार्य सातासमुद्रापलीकडे जावे यासाठी क्लासेस घेऊन त्यांच्या जीवन कार्याची माहिती संस्थेमार्फत देत आहोत.त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे,असेही दास यांनी यावेळी सांगितले.मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही आम्ही ही सेवा चालू ठेवणार आहोत त्यासाठी समितीचे सहकार्य मिळत आहे,अशी माहिती त्यांनी दिली.यावर्षी प्रसाद बनविण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरू केली होती. यावर्षी ड्रायफूट लाडू, बेसन लाडू, कोकोनट चिक्की ,चॉकलेट कुकीज व हँडमेड चॉकलेट अशा पक्कानांचा प्रसाद द्यावा,अशी स्वामी भक्तांची खूप इच्छा होती,असेही ते म्हणाले.या उपक्रमासाठी सेवासार संघाच्या राज्यभरातील सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!