---Advertisement---

वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा

By team
On: April 10, 2024 4:13 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुळस्थान अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने पार पडला.दिवसभर कडक ऊन राहत असल्याने पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी दर्शनाची रांग फत्तेसिंह चौकातील साहिल पॅलेसपर्यंत लागली होती. महिलांची संख्याही लक्षणीय होती.

पहाटे ५ वाजता मंदिरात श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तत्पूर्वी श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सालाबादाप्रमाणे पार पडणाऱ्या नगरप्रदक्षिणा-प्रभात फेरीस स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी पहाटे काकड आरती पूर्वी सुरुवात झाली. काकड आरती नंतर श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्यावतीने श्री स्वामी समर्थांना फळ व मिठाईंचे ५६ भोग नैवेद्य दाखविण्यात आले.यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणे करिता सर्व स्वामी भक्तांना दुतर्फा रांगेतून दर्शनास सोडण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख व सहकाऱ्यांचे सत्संग महिला भजनी मंडळाच्यावतीने भजन व नामस्मरण सोहळा, त्यानंतर हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींच्या पाळण्यातील मुर्तीवर गुलाल पुष्प वाहून पाळणा गीतांनी श्रीं चा पाळणा कार्यक्रम संपन्न झाला.

यानंतर अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले व प्रथमेश इंगळेंच्या हस्ते, मोहन महाराज पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या मुख आरतीने श्रींची आरती संपन्न होवून भजनगीत, पाळणा व आरतीने स्वामींचा जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावात संपन्न झाला. स्वामी प्रकट दिनानिमित्त वटवृक्ष मंदिरात देवस्थानच्यावतीने नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले. मंदीरात भाविकांच्या वतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानाच्या माध्यमातून दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे उपस्थित सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून देण्यात आलेले भोजन प्रसाद ग्रहण करून हजारो स्वामी भक्त तृप्त झाले. भाविकांनी स्वामी दर्शन व भोजन महाप्रसादाची तृप्ती अनुभवली. आज दिवसभरात सोलापूरचे स्वप्निल गायकवाड मित्रपरिवार व श्रीशैल म्हेत्रे मित्रपरिवारच्या वतीने स्वामी भक्तांना बुंदी लाडू प्रसाद व पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

स्वामी प्रकट दिनानिमीत्त माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले राजासाहेब, मातोश्री जयप्रभादेवी राजेभोसले व कुटूंबीय,माजी आमदार रवि पाटील,पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे,उद्योजक राजसिंह दर्डा, कपिल पाटील, अहमदनगरचे वैद्य जीवन कटारिया, प्रथमेश देशमुख आदी मान्यवरांसह हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत असलेल्या मोकळ्या परिसरात भव्य कापडी मंडप उभारण्यात आले होते. ठिकठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आली होती. त्यामुळे प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा भाविकांना मंडपामुळे उन्हाचा त्रास जाणवला नाही. भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेण्याकामी व प्रसंगानुरुप योग्य ते मार्गदर्शन करण्याकामी पोलीस प्रशासनासह मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी आदींसह मंदिर समितीचे अन्य कर्मचारी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी मोहन शिंदे, स्वामलिंग कांबळे, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, रामचंद्र समाणे, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, सुरेखा तेली, कौशल्या जाजू, कृष्णाबाई घाटगे, पूजा साळुंखे, सुवर्णा जाधव, कल्याणी पाटील, प्रेरणा कासेगावकर, सीमा देगावकर आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!