ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनी नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात, २० जागांसाठी ५३ जणांची चुरस

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

दुधनी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार तर नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी तब्बल ५३ उमेदवार मैदानात उतरले आहेत. यंदाची लढत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात चुरशीची रंगणार असल्याचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले.

यंदा प्रथमच दुधनी नगरपरिषदेची निवडणूक तिरंगी होत असल्याने बिनविरोधाची शक्यता फारच कमी होती. अपेक्षेप्रमाणे एका जागेवरही बिनविरोध निवड झाली नाही. शुक्रवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नसल्यामुळे तिन्हीही पक्षांमध्ये काट्याची लढत दिसणार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी प्रथमेश शंकर म्हेत्रे (शिवसेना शिंदे गट), राजेंद्र कोंडीबा इंगळे (राष्ट्रवादी काँग्रेस), अतुल वसंतराव मेळकुंदे (भाजप), महेश शांतय्या बाहेरमठ (काँग्रेस) आणि रेखा संतोष गद्दी (बसप) अशी पाच उमेदवारांची रंगतदार लढत होत आहे. माघारीनंतर या लढतीचे अंतिम चित्र निश्चित झाले आहे.

दरम्यान, दुधनी नगरपरिषद निवडणुकीतील अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून नगराध्यक्ष पदाचे ७ अर्जांपैकी ५ अर्ज वैध तर २ अर्ज अवैध ठरले होते. नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या ९७ अर्जांपैकी ५३ अर्ज वैध ठरले असून तब्बल ४३ अर्ज विविध उणिवांमुळे बाद झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेनंतर राजकीय पक्ष आणि मतदारांचे लक्ष अंतिम उमेदवार याद्यांवर केंद्रित झाले होते. आता अधिकृत याद्या स्पष्ट झाल्याने नगरपरिषद निवडणुकीच्या वातावरणात उत्साहाची नवीन लहर निर्माण झाली आहे.

चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वच पक्ष आता प्रचाराकडे लक्ष केंद्रित करणार आहेत. रस्त्यावरील जनसंपर्क, घरदार भेटी, सोशल मीडियावरील प्रचार अशा विविध मार्गांनी पक्ष मतदारांना आकर्षित करण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसांत प्रचार यंत्रणेचा वेग लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!