हिंगोली वृत्तसंस्था
हिंगोली आणि नांदेडमध्ये आज सकाळीच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. साखर झोपेत असताना भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील २ गावांना भूकंपाचे धक्के बसले. तर हिंगोलीच्या कळमनुरी, औंढा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेडमध्ये ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नांदेडमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. मागील ३ महिन्यातील हा तिसरा भूकंपाचा धक्का आहे. आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव आणि मनाठा या गावांच्या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी नोंद भारतीय भूकंप मापण केंद्रावर झाली आहे.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पश्चिमेस असलेल्या सावरगाव हे या भूकंपाचे केंद्र बिंदू दाखवत आहे. या भूकंपाच्या धक्क्याने या परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. हे भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही जण साखर झोपेत असताना हे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली.
तर दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यात देखील पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले. हिंगोलीच्या कळमनुरी, औंढा तालुक्यात ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोलीच्या कळमनुरीसह औढा तालुक्यातील १५ गावांमध्ये भूकंपेचा धक्के बसले.
पिंपळदरी पांगरा शिंदे, बोल्डा, सिनगी, वापटी या गावांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे दरम्यान प्रशासनानं नागरिकांना घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि सतर्क रहावे असे आवाहन केले आहे. सध्या हिंगोलीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी देखील हिंगोलीमध्ये भूकंपाची अनेक वेळा नोंद झाली होती.