ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मुंबईतील विविध ठिकाणी छापेमारी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या संदर्भात छापेमारी
मुंबई : मुंबईत ईडीच्या पथकाने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील विविध ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या संदर्भात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेताही ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
ईडीची दिल्लीतील टीम मुंबईत दाखल झाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या या धाडसत्राचं महाराष्ट्रातील एका राजकीय नेत्याशी संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण सहा संपत्तींची चौकशी ईडीच्या टीम्सकडून सुरू आहे. दक्षिण मुंबई परिसरात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे.
एकूण सहा मालमत्तांची चौकशी सुरू आहे. या मालमत्तांचा संबंध काही राजकीय नेते, १९९३ बॉम्ब स्फोटातील आरोपी, हसिना पारकर यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. या धाडसत्रात एनआयएच्या टीमचीही तपासात मदत घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या काही जागांच्या व्यवहारांबाबत हे धाडसत्र सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय.