नवी दिल्ली : वृत्तसंस्था
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून गेल्यात काही दिवसांपासून नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. त्यातच छत्तीसडगडमधील विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी सकाळी विजापूर आणि नारायणपूरच्या महाराष्ट्र सीमेवर असलेल्या इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवांद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यात १२ नक्षलवादी ठार झाले आहेत.
बस्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत ठार झालले्या नक्षलवाद्यांची संख्या जास्त असू शकते. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरु आहे. या चकमकीच्या ठिकाणी अनेक स्वयंचलित शस्त्रे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत.
सध्या डीआरजी विजापूर, एसटीएफ, सी-60 जवान परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. विजापूरमध्येच 1 फेब्रुवारी 2025 रोजी गांगलूर परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये 8 नक्षलवादी ठार झाले होते. गेल्या महिन्यात 20-21 जानेवारीदरम्यान छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवर असलेल्या गरीबीबंद जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 16 नक्षलवादी ठार झाले होते. यामध्ये 90 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल चालपातीचाही समावेश होता.