जालना वृत्तसंस्था : निवडणुकीत पराभव झाला म्हणून मी खचलेलो नाही. मी आमदार नसलो तरी एका नाही तर दोन-दोन आमदारांचा बाप आहे. सरकार माझं आहे आणि जालन्याच्या विकासासाठी लागेल तितका निधी खेचून आणण्याची ताकद माझ्यात आहे,” अशा ठाम शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरण्यासाठी आयोजित कॉर्नर बैठकीत दानवे बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी करत राजकीय विरोधकांचा समाचार घेतला.
लोकसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य करताना दानवे म्हणाले, “मी पडलो म्हणून माझं तोंड वाकडं झालं नाही. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मी जनतेत गेलो आणि संपूर्ण मराठवाड्याचा दौरा केला. मी आजही एका सामान्य घरातील कार्यकर्ता आहे.”
यावेळी खासदार कल्याण काळे यांचा उल्लेख करत दानवेंनी उपरोधिक टोला लगावला. “मला पाडलं, कल्याण निवडून आले. आता करून घ्या कल्याण… पण गेल्या दोन वर्षांत जालन्यासाठी दोन लाख रुपये तरी आणले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वक्तव्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनीही “काहीच आणलं नाही म्हणूनच मी तुमच्याकडे आलो,” असे म्हणत वातावरणात हास्य निर्माण केले.
दानवेंनी कार्यकर्त्यांना थेट मैदानात उतरायचे आवाहन करत म्हटले, “आम्ही स्वबळावर महानगरपालिका लढवत आहोत. वॉर्डातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलवा आणि समोरासमोर विकासाचा हिशोब मागा. जो हरेल, त्याने भर चौकात कान धरून पाच उठबश्या मारायच्या.”
“आता फक्त ओरडायचं नाही, तर लोकांशी संवाद साधायचा. शेजारी-पाजाऱ्यांना चहा प्यायला बोलवा आणि जालना महानगरपालिका भाजपकडे का असायला हवी, हे पटवून द्या. जालन्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,” असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.