पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य मंडळातर्फे दुष्काळसदृश भागांतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दहावी, बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना पात्रतेची आवश्यक माहिती, स्वतःच्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शुल्क प्रतिपूर्ती केली जाणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
राज्यातील १५ जिल्ह्यांतील ४० तालुके, त्या व्यतिरिक्त १,०२१महसूल विभागांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या भागांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आरटीजीएस, एनईएफटीद्वारे परीक्षा शुल्काची रक्कम परत केली जाणार आहे. स्वयंअर्थसहाय्यित शाळा वगळता शासकीय शाळा, खासगी अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहणार आहे.