अहिल्यानगर वृत्तसंस्था : राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजताच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना अहिल्यानगरमधून धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) दोन उमेदवार अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या चोवीस तासांपासून या उमेदवारांचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झालेला नसल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट होत असतानाच ही घटना घडल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
प्रभाग क्रमांक 17 मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी गायब झालेल्या उमेदवारांची नावे असून, केडगाव परिसर संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच या उमेदवारांचे अपहरण करण्यात आल्याचा संशय मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायब झालेल्या दोन उमेदवारांपैकी एक भाजपच्या तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत होता. या प्रकरणामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, तात्काळ तपास करून उमेदवारांचा शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. या घटनेमुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात भीती आणि चर्चांना उधाण आले आहे.