नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर आता विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे.
मात्र अबकी बार ४०० पार हा मोदींचा नारा सत्यात उतरताना दिसत नसून, भाजपा आणि एनडीएला मिळून साडेतीनशेच्यावर जागा मिळताना दिसत आहेत. टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमधील आकडेवारी पाहिल्यास देशातील ५४३ जागांपैकी ३५३ ते ३६८ जागा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या खात्यात ११८ ते १३३ जागा जाण्याची शक्यता आहे. तर इतर पक्ष ४३ ते ४८ जागा जिंकण्याची शक्यता आहे.
या एक्झिट पोलममध्ये महाराष्ट्रासाठी मात्र धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार देशात जोरदार मुसंडी मारणाऱ्या भाजपा आणि एनडीएला महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महायुतीला २२ आणि महाविकास आघाडीला २५ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतरांच्या खात्यात एक जागा जाऊ शकते.
याबरोबरच रिपब्लिक-PMARQ च्या एक्झिट पोलनुसार देशात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनजीएला ३५९ आणि इंडिया आघाडीला १५४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला २७ ते ३२ आणि महाविकास आघाडीला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना एक जागा मिळू शकते.
जन की बातच्या एक्झिट पोलनुसार भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३६२ ते ३९२ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला १४१ ते १६१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना १० के २० जागा मिळू शकतात.