सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
देवेंद्र फडणवीस हे कालपर्यंत तर नुसत्या थापाच मारत होते. देवेंद्र फडणवीस हे तर फसवणीस आहेत, ते नुसता म्हणतात करतो करतो मात्र त्यांनी काहीच केले नाही. भाजपचे लोकं फक्त आश्वासनावर आश्वासन देतात, असा टोला काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे. रम्यान प्रणिती शिंदे म्हणाल्या की, विरोधक खोटे आरोप करून चारित्र्यहणन करतील. तर, सुशीलकुमार शिंदे यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. जर, त्यांच्याकडे पुरावे होते, तर मागच्या 10 वर्षात कारवाई का नाही केली?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती विरोधकांचा प्रचार सुरू आहे, ते पाहून येणाऱ्या काळात माझ्यावरती वैयक्तिक आणि माझ्या कुटुंबावरती चुकीचे आरोप केले जातील याची मला शंका वाटते. चुकीची माहिती पसरवून चारित्र्यहणन करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. चुकीचे फोटो, चुकीची माहिती देऊन चारित्र्यहणन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझी त्यांना विनंती आहे, मागील दहा वर्षात त्यांनी काय काम केले याचा लेखाजोखा मांडा आणि त्यावरती निवडणूक लढवा. सोलापूरकर हुशार असून, अशा अफवांना बळी पडणार नाहीत. सोशल मीडियावर ते म्हणतात की, आता रामराज्य येणार आहे, मग मागील दहा वर्ष रावण राज्य होते का? असा सवालही प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे.मागच्या 10 वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे. मागच्या 10 वर्षात मतदारांनी सगळं भाजपला दिल.मात्र त्यांनी तुम्हाला ठेंगा दिला, भाजपने तुम्हाला धोका दिला. तुमचा विश्वासघात केला. मागच्या 10 वर्षात सोलापूरने निवडून दिलेल्या भाजपच्या खासदाराने काय काम केलं हा एकच प्रश्न त्यांना विचारा,त्यांची बोलती बंद होईल. ऐन इलेक्शनच्या तोंडावर पेट्रोलचा वाढलेला भाव फक्त 2 रुपयांनी कमी केला, म्हणजे ही लोक आपणाला भीक देतायत की काय? यांच्याकडे आमदारांना विकत घ्यायला 50 कोटी आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रातोरात अटक करतात. जर 400 पार होणार याबद्दल तुम्हला एवढा आत्मविश्वास आहे तर एवढी भीती का आहे तुम्हाला? ही लोक 400 सोडा मुश्किलने 100 च्या पण पार जाणार नाहीयेत,कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे. समोरून उज्वला योजना आणतात आणि मागून पिवळे कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर त्या सिलेंडरवरती काय शिजवायचे..? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी विचारला आहे.