ध्यास विश्वसार्ह बातमीचा

थकवा, चक्कर, केस गळती? दुर्लक्ष नको; महिलांमध्ये एनीमिया वाढतोय

महिलांमध्ये एनीमिया म्हणजेच रक्ताची कमतरता ही समस्या खूप सामान्य आहे. मात्र अनेक वेळा ही समस्या एखाद्या मोठ्या आजारामुळे नव्हे, तर रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या चुकीच्या सवयींमुळे वाढताना दिसते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वेळेवर लक्ष दिलं नाही तर ही समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते.

आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ५७ टक्क्यांहून अधिक महिला एनीमियाने त्रस्त आहेत. शरीरात लोहाची कमतरता झाली की हिमोग्लोबिन कमी (Iron Deficiency) होतं आणि त्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. यालाच एनीमिया म्हणतात.

महिलांमध्ये लोहाची कमतरता का वाढते?

डॉक्टर सांगतात की, महिलांमध्ये लोह कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे मासिक पाळीदरम्यान होणारा जास्त रक्तस्राव. दर महिन्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यास शरीरातील लोह साठा हळूहळू कमी होत जातो. यासोबतच चुकीचं खानपानही एनीमियाला कारणीभूत ठरतं.

चुकीचं खानपान ठरतं धोकादायक

आजकाल अनेक महिला वजन कमी करण्यासाठी किंवा व्यस्त जीवनशैलीमुळे कमी खातात. सतत लो-कॅलरी डाएट घेतल्याने शरीराला आवश्यक असलेलं लोह मिळत नाही. हिरव्या पालेभाज्या, डाळी, साबूत धान्य, गूळ, बीट, सुकामेवा यांचा आहारात अभाव असल्यास हिमोग्लोबिन झपाट्याने कमी होऊ शकतं.

जास्त चहा-कॉफी पिण्याची सवय

दिवसभर वारंवार चहा किंवा कॉफी पिणंही लोहाच्या शोषणासाठी घातक ठरतं. चहा आणि कॉफीमधील टॅनिन व कॅफीनमुळे शरीर लोह नीट शोषून घेत नाही. विशेषतः जेवणानंतर लगेच चहा-कॉफी घेतल्यास लोह शोषण ४० ते ६० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं.

मासिक पाळीची समस्या दुर्लक्षित करू नका

अनेक महिला जास्त दिवस किंवा खूप रक्तस्राव होणारी पाळी ही सामान्य गोष्ट मानून दुर्लक्ष करतात. मात्र सतत हेवी पीरियड्स होणं हे एनीमियाचं मोठं कारण ठरू शकतं. वेळोवेळी हिमोग्लोबिनची तपासणी न केल्यास ही समस्या गंभीर होऊ शकते.

थकवा आणि कमजोरीकडे दुर्लक्ष नको

सतत थकवा जाणवणं, चक्कर येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, केस गळणं किंवा त्वचा फिकट दिसणं ही एनीमियाची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. अनेक महिला ही लक्षणं घरकामाचा ताण किंवा तणाव समजून दुर्लक्ष करतात, जे धोकादायक ठरू शकतं.

वेळीच काळजी घ्या

तज्ज्ञांच्या मते, एनीमियाची सुरुवात लवकर ओळखली तर योग्य आहार, तपासणी आणि उपचारांनी ही समस्या सहज नियंत्रणात आणता येते. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देत नियमित तपासणी आणि संतुलित आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!