सातारा : वृत्तसंस्था
छत्रपती शिवरायांची बहुप्रतिक्षित वाघनखे अखेर विशेष विमानाने उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात येणार असून दि. 19 जुलैला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा होणार आहे. हिंदवी स्वराज्याच्या सातारा या चौथ्या राजधानीतील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये ही वाघनखे लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. यासाठी विशेष दालनही उभारण्यात आले आहे.
लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार असून साताऱ्यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघनखे इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पाहता येणार आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनखे भारतात कधी येणार ही प्रतीक्षा आता संपली असून गुरुवारी संध्याकाळी ही वाघनखे महाराष्ट्रात विशेष विमानाने आणली जाणार आहेत.
पुरातत्त्व विभागाच्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात येणार असून शुक्रवारी दि. 19 जुलै रोजी भव्य दिव्य सोहळा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील इतर लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. वाघ नख भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. वाघनखे आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा 14 लाख 8 हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.