मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरु झाला असून यात आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
अनिल परब म्हणाले कि, राज ठाकरे म्हणाले होते, दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही, आता सभा घेऊन कोणाचं पोर खेळवणार? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला असून किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी ‘स्टार प्रचारक’ करा अशी टीकाही त्यांनी केली आहे. आज प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांच्यावर बोलतांना अनिल परब म्हणाले,”राज ठाकरे यांनी सांगितले होते की मी इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही. मग आता जर उमेदवार त्यांचा नाही तर शिवतीर्थावर सभा कोणासाठी घेणार आहे? आम्ही ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्याच दिवशी आम्ही महापालिकेकडे शिवतीर्थ आम्हाला सभेसाठी मिळावे यासाठी अर्ज केला आहे. सगळं काही रेकॉर्डवर आहे. आम्हाला आमची स्वतःची पोरं आहेत”, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.
तसेच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यावरून देखील अनिल परब यांनी खोचक टोला लगावला आहे. पुढे ते म्हणाले, ”महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला या भ्रष्ट्राचार मान्य होता का? राहुल शेवाळे, यामिनी जाधव, वायकर या सर्वांचे प्रचारप्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती केली जाणार का? माझी अशी विनंती आहे की त्यांनाच यांचे स्टार प्रचारक करावे. कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला हे उमेदवार मिळाले आहेत. लाखमोलाचे जे उमेदवार महायुतीला मिळाले आहेत, त्याचे श्रेय किरीट सोमय्या यांनाच जाते. मग किरीट सोमय्या यांनाच या उमेदवारांचा प्रचार करायला लावावा. सोमय्या यांनी हे उमेदवार कसे स्वच्छ आहेत, हे महाराष्ट्राला समजावून सांगावं अशी माझी भाजपा विनंती आहे”, अशी खोचक प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.