ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाडकी बहिण योजनेत परप्रांतीय बहिणींनी घेतला लाभ !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यात लाडकी बहिण योजना राबविली होती. या योजनेत राज्यभरातील अनेक महिलांसाठी लाभदायक ठरत असली तरी, अद्यापही निकष आणि कागदपत्रांची अपूर्तता यांमुळे अनेक महिला या लाभापासून वंचित आहेत. मात्र, दुसरीकडे या योजनेत परप्रांतीय रॅकेट सक्रिय झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परराज्यातील महिलांच्या नावे बोगस अर्ज दाखल करून योजनेचा लाभ मिळवल्याचे उघड झाले आहे. या गैरव्यवहारामुळे योजनेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लाडकी बहीण योजना ही फक्त महाराष्ट्राच्या नागरिक असलेल्या आणि पात्र निकष पूर्ण करणाऱ्या महिलांसाठीच आहे. असे असताना, परराज्यातील महिलांच्या नावावर अर्ज कसे काय दाखल झाले? ई-सकाळच्या वृत्तानुसार, महाराष्ट्राबाहेरील महिलांच्या नावावर बनावट लॉगिन आयडी तयार करण्यात आले. याच्या मदतीने तब्बल 1171 अर्ज दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, सांगली, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून हा गैरव्यवहार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अर्जदार महिला उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील रहिवासी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी आलेले बोगस अर्ज आढळताच, संबंधित लाभार्थ्यांचे लाभ तत्काळ स्थगित करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. अर्जांसोबत जोडलेले आधार, पॅन आणि इतर कागदपत्र अस्पष्ट असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, दोन लॉगिन आयडींमधूनच 1171 बनावट अर्ज दाखल झाले असून, त्यातील अनेक अर्ज सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच, बार्शी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक मदतीचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मात्र, या योजनेत परप्रांतीय रॅकेट सक्रिय झाल्याने ही योजना बोगस अर्जदारांच्या तावडीत सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच, या गैरव्यवहारात सामील असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!