अक्कलकोट तालुका प्रतिनिधी: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे लोकसहभाग व ग्रामस्थांच्या श्रमदानातून भक्कम असा वनराई बंधारा साकारण्यात आला आहे.पाणी साठवण व भूजल पातळी वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम गावासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या वनराई बंधाराचे उद्घाटन अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते झाले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी अमोल मुंडे, विस्तार अधिकारी दोडमणी, संजय पाटील,सरपंच नितीन मोरे, ग्रामविकास अधिकारी अभिमन्यू ताड, उपसरपंच शरणू कोळशेट्टी, विकीबाबा
चौधरी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बंधाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाचा कोणताही निधी न वापरता तो पूर्णतः लोकसहभाग व श्रमदानातून उभारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या या कामामुळे गावात सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले.
साकारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता सुमारे ३ लाख लिटर इतकी आहे. कारखान्याच्या खालच्या भागात हा बंधारा उभारण्यात आल्याने पावसाचे पाणी अडवून योग्य पद्धतीने साठवले जाणार आहे. या बंधाऱ्यामुळे परिसरातील ५० ते ६० हेक्टर शेती क्षेत्राला थेट लाभ होणार असून शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणाऱ्या भागात हा बंधारा दिलासा देणारा ठरणार आहे.
याशिवाय परिसरातील विहिरींना झरे जिवंत राहण्यास मदत होणार असून भूजल पातळी वाढण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी सुटणार असल्याचे मत सरपंच मोरे यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना ग्रामविकास अधिकारी अभिमन्यू ताड यांनी गावात आणखी दहा ते पंधरा वनराई बंधारे उभारण्याचा मानस व्यक्त केला. ग्रामस्थांच्या सहकार्याने जलसंधारणाची ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी जाहीर केला.