मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे दि.२३ रोजी शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.
मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी होते. विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदे मनोहर जोशी भूषवली होती. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते.
प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. 1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. बालपण-ध्येयाकडे खडतर सुरुवात सुसंस्कृत पण गरिब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तंत्रानं लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या नशीबी होता. वडिलांबरोबर भिक्षुकी करून पैसे मिळवू लागले.