सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे निर्भय बनो सभेसाठी रविवारी हेरिटेज लॉन्स या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदेंनी भारतरत्न पुरस्कारावर प्रतिक्रिया दिली. लालकृष्ण अडवाणी, स्वामीनाथन, पी व्ही नरसिंहराव, कर्पूरी ठाकूर, चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. सरकारच्या भारतरत्न पुरस्काराच्या घोषणेबाबत स्वागत करताना सुशीलकुमार शिंदें यांनी टोलेबाजी केली. सर्वांना एकदा एका लाइनमध्ये उभे करून भारतरत्न पुरस्कार द्या. भारतरत्न पुरस्काराची मागणी अनेक जण करत आहेत. बाळासाहेब ठाकरे, सावरकर, फुले दाम्पत्य यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. मात्र दिले जात नाही. ज्यांनी ज्यांनी मागणी केलीय त्या सर्वांना भारतरत्न पुरस्कार देऊन टाका, म्हणजे कुणी शिल्लक राहणार नाही असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केले आहे.
राज्यात गोळीबार, हत्याकांडासारख्या घटना घडल्या आहेत. त्यावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी चिंता व्यक्त केली आहे. सरकारचा वचकच राहिला नाही. या सर्व घटनांना वेळीच नियंत्रित केले नाही तर याहीपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होईल. राज्यातील शांतता बिघडत चालली आहे, याची खबरदारी मुंबई पासून दिल्लीपर्यंत घेतली पाहिजे. राज्यातील पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना भाषा खालच्या तळावर जाऊन भाष्य करत आहेत. ही भाषा योग्य नव्हे. गल्ली बोळात चेंडू खेळताना जी भाषा वापरली जाते, त्या प्रकारची भाषा सत्ताधारी पक्षातील मंत्री वापरत आहेत, असे म्हणत सुशीलकुमार शिंदेंनी चिंता व्यक्त केली