श्री क्षेत्र शिवपुरीत होणार भव्य अग्निमंदिराची पायाभरणी
जागतिक अग्निहोत्र दिनी बुधवारी कार्यक्रमांचे आयोजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आधुनिक जगातील सर्वांत मोठ्या अग्निमंदिराची स्थापना जागतिक अग्निहोत्र दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र शिवपुरीच्या पावन भूमीत केली जाणार आहे. ह्या सप्त मंदिरांचे दर्शन म्हणजेच सर्व पापांतून मुक्ती व पुण्यसंचयाचा लाभ तथा मनःशांती, आनंद, आरोग्य आणि यश प्राप्तीचा मार्ग ठरणार आहे,अशी माहिती शिवपुरी विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी दिली.याबाबत
अधिक माहिती देताना डॉ.राजीमवाले म्हणाले, जगभरातल्या साठहून अधिक देशांमध्ये ज्यांच्या घरात दररोज अग्निहोत्र केले जाते.त्यांच्याकडून अग्निहोत्राचे भस्म आणून ह्या मंदिराची पायाभरणी केली
जाणार आहे.
अग्निमंदिर हे ज्ञान, प्रकाश तसेच मोक्ष प्राप्तीचे प्रतीक आहे म्हणूनच त्याचा आकार सहस्रदल कमळासारखा तयार केला जाणार आहे.दिव्य अग्नी हा जणू भूमीच्या गर्भातून इथे प्रकटला आहे.ऋग्वेदात असे लिहिलेले आहे, की अग्नीतून जल आणि जलातून भूमी प्रकट झाली.मंदिरातील पंच अग्नींची ज्वाला आपल्याला प्रगतीकडे व स्वर्गवास जीवनाकडे घेऊन जाते, म्हणून अग्नीचा प्रवाह हा नेहमी आकाशाकडे ऊर्ध्वगामी असतो. या जगातल्या मोह-मायेपासून आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जाणारा असतो हा अग्नी.या मंदिराचे वैशिष्ट्य असे की, या मंदिराचा पाया आपल्याला कमळाच्या आकारामधून पृथ्वीचे दर्शन घडवणारा आहे. त्या गर्भातूनच अग्नी बाहेर येतो आणि तोच आपल्याला स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. त्याच बरोबर मंदिराचे शिखर सात टप्प्यांमध्ये केले आहे.
जे सप्तस्वर्गाकडे जाण्याचा मार्ग दर्शविते. या सातही मंदिरांची परिक्रमा म्हणजेच एका व्यक्तीच्या आजीवन प्रवासाचे प्रतिनिधित्व दाखवणारा मार्ग ठरेल.तेथेच जवळ असलेल्या वटवृक्षाची स्थापनाही परमसद्गुरूंनीच केली होती.या झाडाची मुळे आणि पारंब्या आपल्या आधीच्या सात पिढ्या आणि आपल्या नंतरच्या सात पिढ्या दर्शवितात.फक्त या एका झाडाजवळ तर्पण करून आपण सर्व पिढ्यांचे दोष दूर करू शकतो.म्हणूनच अग्निमंदिराला एक विशेष महत्त्व आहे.सप्त सागर, सप्त सिंधू म्हणजेच जगभरातील नद्यांचे पाणी आणून त्याचे प्रोक्षण केले जाणार आहे. सात खंडांतील माती आणि प्रमुख नद्यांचे पाणीदेखील येथे आणण्याचे प्रयोजन केले जाणार आहे.
या वास्तूमध्ये एका तीर्थकुंडाची बांधणीदेखील येथे होणार आहे. त्या ठिकाणी पवित्र सरस्वती जलामध्ये प्रोक्षण करून आपण अग्निमंदिराचे दर्शन घेऊ शकणार आहोत. या ठिकाणी स्थित सहा मंदिरांची परिक्रमा आपण सहपरिवार पूर्ण करावी,त्याने आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील आणि जीवनात एक नवा दृष्टिकोण लाभेल ही खात्री
आहे.याच ऐतिहासिक, आध्यात्मिक व अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या अग्निमंदिराच्या निर्माणासाठी आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा व शिवपुरीला भेट देऊन आपल्या व आपल्या कुटुंबाचे कल्याण साधावे,असे आवाहन त्यांनी केले आहे. हा सोहळा उद्या १२ मार्च रोजी डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले व डॉ.गिरीजा राजीमवाले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती नाना गायकवाड यांनी पत्रकारांना दिली. यावेळी जेष्ठ पत्रकार एस.के .कुलकर्णी,अण्णा वाले मोहन डांगरे, वक्रतुंड औरंगाबादकर,पवन कुलकर्णी, डॉ.गणेश थिटे,धनंजय वाळुंजकर आदी उपस्थित
होते.
शिवपुरीचे वाढते महत्व
सन १९६९ साली परमसद्गुरूं श्री गजानन महाराजांनी हजारो वर्षानंतर एकमेवाद्वितीय असा महासोमयाग यज्ञ करून हे शिवपुरी यज्ञनगर वसविलेले आहे. यज्ञनगरी शिवपुरी मधून येणाऱ्या काळात मानवजातीच्या कल्याणासाठी उच्चतम कार्य संपन्न होणार आहे. परमसद्गुरूंनी या शिवपुरी यज्ञनगरीत यापूर्वी सहा ऊर्जा स्थानांची निर्मिती केलेली आहे. ही स्थाने अध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवी शरीरात व पंचतत्वात आढळतात.
संपूर्ण विश्वाला ऊर्जा आणि दिशा देणारी वास्तू
शिवपुरीमध्ये आता १२ मार्च या अतिपवित्र दिवशी विश्वाला ऊर्जा व दिशा देणारी जी वास्तू उभी राहणार आहे.तिचे भूमिपूजन सकाळी ९:३० च्या सुमारास होणार आहे. विविध क्षेत्रातील निमंत्रित तसेच परमसद्गुरू श्री गजानन महाराज प्रणित वेदोक्त पंचसाधन मार्गाचे ठिकठिकाणचे अनुयायीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास उपस्थित राहावे.
डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले,अध्यक्ष विश्व फाउंडेशन, शिवपुरी