मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला आहे. पुढची चार वर्षे विधानपरिषदेची आमदारकी असतानाही तुम्ही विधानसभेची निवडणूक का लढवली? असे लोक विचारत होती. पण ज्याने आपल्याला पाडले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती. गडी थोडक्यात हुकला, ती बी थोडा फार दगाफटका झाला म्हणून नाहीतर गाठले होते, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला आहे.
राम शिंदे म्हणाले, चांगले काम करणे हे वाईट असेट हे मला उशिरा कळाले. आमच्या मतदारसंघाचा माणूस भेटला नाही बाहेरून पाठवला. मागच्या वेळी 43 हजार मतांचा फरक होता यावेळी 1243 मताचा फरक राहिला. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थितीत इंदापुरात सभापती राम शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार पार पडला. यावेळी राम शिंदे बोलत होते.
रोहित पवारांवर बोलताना राम शिंदे म्हणाले, ज्यांच्याकडून पराभव झाला ते 288 मध्ये येतात आणि वरील सभागृहात 78 आहेत असे 368 जण सभागृहात आहेत. राज्याला एक सभापती आहे तो सगळ्या आमदारांचा सभापती असतो. त्याच्यामुळे ‘हार कर भी बाजीगर’ अशी ती भानगड झाली आहे. काय त्यांच्यावर बेतली असेल तुम्हीच जाणून घ्या, असे राम शिंदे म्हणाले.
आमच्या मतदारसंघातील लोक म्हणतात हजार पाचशे मते कमी पडली होती. यालाच दिली असती तर बर झाले असते, नाहीतर हे निवडून दिलं याचा काय उपयोग नाही आगे बी नाही आणि पीछे बी नाही, असाही टोलाही राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला आहे. राज्यात नाही केंद्रात नाही, कामे होण्याची काही शक्यता नाही. कोणत्याही पार्टीकडून काम आणले तर कोणी एकले तर मी सध्या तीनही पक्षाचा सभापती आहे, असे राम शिंदे म्हणाले.
लोक म्हणतात राम शिंदे नशीबवान आहे, मी तर नशीबवान आहेच. कारण पण पडलो तरीही आमदार झालो, सभापती झालो. जे पडले आहेत त्यांची काय अवस्था आहे. राज्यातील सगळी लोकं म्हणतात येऊ का? 288 मध्ये 240 आमदार सत्तेत आहेत. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता राहिला नाही, विरोधात राहून करतील काय? निवडून आलेल्या 240 मधील 42 मंत्री आहेत, 198 आमदार आहेत आणि मी सभापती आहे असेही राम शिंदे म्हणाले. मी झोपल्यावर कधी कधी विचार करतो, आपले बरे झाले का वाईट झाले. जरी निवडून आलो असतो तरी 42 मध्ये मिळाले असता की नाही तो वेगळाच भाग असल्याचे राम शिंदे म्हणाले.