सोलापूर : प्रतिनिधी
ओरिसा, आंध्रप्रदेश येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कोंडी गावाच्या हद्दीत सिद्धेश्वर हॉटेलजवळील पुलावर पाठलाग करून अटक केली. त्यांच्या ताब्यातून ५६४ किलो ग्रॅम वजनाचा आणि १ कोटी ३६ लाख ८३ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा पिकअप वाहन व कारसह जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरून चोरट्या पद्धतीने अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार विजयकुमार भरले यांना, एका चारचाकी वाहनातून दोन इसम आंध्र प्रदेशमधून गांजा घेऊन बारामतीकडे जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार भरदुपारी अडीच वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोंडी गावाच्या पुलावर अशोक लेलॅण्डचा पाठलाग करून पकडले. तपासात त्यात ५६४ किलो ग्रॅम गांजा (किंमत १ कोटी रुपये) दिसून आला. तालुका पोलीस ठाण्यात अल्ताफ युनुस इनामदार (वय ३८. पिंपळी, बारामती) तसेच इब्राहिम शेख (३५, रा. सिद्धेश्वर गल्ली, बारामती) या दोन वाहन चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर लाला बागवान हा आरोपी फरार झाला. तसेच २४ जानेवारी रोजी मोडनिंब येथील मोडनिंब ते जाधववाडी रस्त्यावर २ चारचाकी वाहनामधून काही इसम गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून वाहनांचा पाठलाग करून २ वाहने चालकांसह ताब्यात घेतली. सापडलेल्या कारमधून १०५ किलो वजनाचा आणि ३६ लाख ३६ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
या प्रकरणात कदीर असिफ पठाण (३८, रा. आदर्श चौक, मोहोळ), प्रकाश संतोष बारटक्के (२७, रा. तेलंगवाडी, मोहोळ) ऋषिकेश देवानंद शिंदे (२७, रा. तेलंगवाडी मोहोळ), संतोष तुकाराम कदम (४३, रा. लवंग, ता. माळशिरस) या चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील सुरेश दुधनीकर (रा. पुणे) व राजकुमार बाळासाहेब घोलप (रा. तेलंगवाडी, मोहोळ) हे दोन आरोपी फरार झाले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर, धनंजय पोरे, सुरज निंबाळकर, राजेश गायकवाड, महंमद मुजावर, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, नीलकंठ जाधवर, धनाजी गाडे, परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, यश देवकते, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, दिलीप थोरात, सतीश कापरे या पथकाने पार पाडली.