ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट : 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील रोशन मशिदीजवळील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. स्वयंपाक करताना गॅसचा भडका झाला आणि सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. शहराच्या जिन्सी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पठाण कुटुंबातील तीन महिला व चार मुले रात्री आठच्या सुमारास घरात होती. महिला स्वयंपाक करत होत्या, तर मुले खेळत होती. गॅसने पेट घेतला. आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न करत असताना मोठा स्फोट झाला. त्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग भडकताच मुलांना घेऊन महिला घराबाहेर पळल्या, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, जिन्सी ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाढे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी आले. आगीमुळे महावितरणच्या ताराही वितळल्या आणि अंधारामुळे मदतकार्यात अडथळे आले.

किराडपुरा भागात रोशन मशिदीजवळ अगदी छोट्या गल्ल्या आहेत. त्यात पठाण यांचे दोन खोल्यांचे घर आहे. घरातील पुरुष नारेगाव परिसरात भंगारचा व्यवसाय करतात, अशी प्राथमिक माहिती आहे. स्फोटानंतर घराचे पत्रे उडाले. काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. गल्ल्या अरुंद असल्यामुळे अग्निशमन आणि पोलिसांना पोहोचणे अवघड झाले. स्थानिकांनी पाणी आणि वाळूच्या साह्याने काही प्रमाणात ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!